राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपाला मतदान करू नका : बाळासाहेब थोरात
रावेर (7 नोव्हेंबर 2024) : राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपने उभ्या केलेल्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नका, एकी ठेवा, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रावेर-यावल मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या रावेर येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले. रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रावेरातील आठवडे बाजार मैदानावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
भाजपाने केले मते फोडण्याचे काम
थोरात बोलतांना ते पुढे म्हणाले की, हे विकासावर बोलणार नाही भाजपनेच या ठिकाणी दुसरा उमेदवार उभा करीत मत फोडण्याचे काम केले आहे. भाजपवर टीकास्त्र सोडत बाळासाहेब यांनी रावेरातील सभा गाजवली. धनंजय चौधरी यांच्यासाठी मतदानाची साददेखील घातली.

यांची सभेला उपस्थिती
जाहीर सभेला तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्री सीताक्का, शिवसेना संपर्क नेते संजय सावंत, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उदय पाटील, ज्येष्ठ नेते रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार रमेश दादा चौधरी, श्रीराम पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तरुण रक्ताला संधी द्या
बाळासाहेब थोरात म्हणाले की, धनंजय चौधरी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले एका परिपक्व व्यक्तीसारखं भाषण आज या तरुण युवकाने केले. तुमच्यासमोर तुमचा गडी तयार आहे, तुम्हाला गोड फळ खायचं असेल कायम चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी त्याला मशागत करावीच लागते. नक्कीच मतदारसंघातील नागरिक धनंजयला बळ देतील. तरुण जरी नवखा उमेदवार असला तरी त्याला तुमची साथ द्या. तो पुढचे अनेक वर्ष कायम तुमच्यासोबत असेल असे देखील यावेळी ते म्हणाले.
भाजपाकडून राज्य घटना तोडण्याचे काम
भाजपावर टीकास्त्र करताना त्यांनी सांगितले राज्यघटना ही प्रत्येकाला समान अधिकार देते पण राज्यघटना तोडण्याचे काम हे भाजप करत आहे. आपल्या येथील महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. त्यांना संसद भवनाचे उद्घाटनाचे निमंत्रणदेखील यांनी दिलं नाही. यांचा राम देखील खरा राम नाही यांचा राम फक्त नथुराम आहे, खरा राम आमचा आहे. आमच्या महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांच्या शेवटच्या क्षणी शेवटचा शब्द ‘हे राम’ हाच उच्चारला होता. सध्याचे सरकार देखील हे महाराष्ट्राला मान्य नाहीये. महाविकास आघाडीने पूर्ण दोन वर्ष कोरोनामध्ये शेतकर्यांची कर्जमाफी केली. प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेतली मात्र महाविकास आघाडीचे सरकार तोडण्याचे काम केलं.
70 हजारांचा सिंचन घोटाळा करणार्यांच्या हाती तिजोरीची चावी
महाराष्ट्र मोडीत काढल्याने त्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असे यांचेच पंतप्रधान बोलले. लगेच इकडे येऊन परत तिजोरीच्या चाव्यात त्यांनाच दिल्या, असे म्हणत न खाऊंगा न खाऊ दुकाने दूंगा असे म्हणणार्यांनी भ्रष्टाचाराचे दुकान उघडून ठेवलं, असे म्हणत अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. इथे लाडक्या बहिणीच्या योजना देतात. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना त्यांचे लक्ष नाही.
सत्तेसाठी बहिण झाली लाडकी
रोजच महिलांवर अत्याचार होतात मात्र तुमची बहीण लाडकी नाहीये सत्तेसाठी चालले आहे. फक्त युवक शेतकरी यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही. यांना अजिबात बळी पडू नका, असे म्हणत तुमचा एक प्रतिनिधी म्हणून धनंजयला पाठवायचं. तुम्हाला एक चांगला आमदार म्हणून तुम्ही धनंजयला पाठवायचं. आपण सर्व एक कुटुंब आहोत, तुमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत त्यांनी धनंजयला आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि मतदान करावं, असे आवाहन यावेळी धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ असलेल्या जाहीर सभेत बाळासाहेब थोरात यांनी केले.




