जळगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पावणेपाच लाखांचा चुना
जळगाव (8 नोव्हेंबर 2024) : सोशल मीडियाच्या मदतीने सायबर ठगांनी ऑनलाईन जॉबद्वारे पैसे देण्याची ऑफर केली. त्यानंतर ठगांनी ऑनलाईन चार लाख 72 हजार 465 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवार, 6 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
26 वर्षीय तक्रारदार तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेतो. 11 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 5.37 वाजेपासून ते 21 ऑक्टोंबर 2024 पावेतो या तरुणाशी सायबर ठगांनी संपर्क साधला. टेलीग्राम या सोशल मॅसेजिंग अॅपवरील रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने या तरुणाला प्राईस रनर कॉम या वेब साईटच्या माध्यमातून ऑनलाईन जॉब करण्याची माहिती दिली. तसेच या माध्यमातून भरपूर पैसे देण्याचे अमिष दाखविले.
तरुणाकडून वेळोवेळी युपीआय व एनएफटीच्या माध्यमातून ठगांनी पुरविलेल्या युपीआय व आयडी व बँक खात्यात पैसे मागविले. तरुणाकडून तब्बल पावणे पाच लाखांची रक्कम ठगांनी घेतली मात्र मोबदला किंवा नफा काहीच दिला नाही. बँक खात्यात होती ती रक्कम या तरुणाने मात्र गमाविली.
तरुणाने सबंधिताना मोबाईलवरुन संपर्क साधला असता ठगांनी प्रतिसाद दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तरुणाच्या तक्रारीनुसार बुधवार, 6 रोजी या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.