जळगावात दुचाकीस्वाराकडून तब्बल 15 लाखांची रोकड जप्त
जळगाव (10 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिसांनी इच्छादेवी चौफुलीजवळ नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडून तब्बल 15 लाखांची रोकड जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. रोकडबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली.
नाकाबंदीदरम्यान कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावसह राज्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. शहरातील पांडे चौकाकडून एक बुलेटस्वार (एम.एच.19 सी.ए.6031) आकाशवाणीकडे पैसे घेऊन जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सायंकाळी पोलिसांच्या पथकाने इच्छादेवी चौकातच बुलेटस्वाराला अडवून त्याच्या डिक्कीची झाडाझडती घेतली. डिक्की उघडताच त्यात तब्बल 14 लाख 86 हजार 400 रुपयांची रोकड मिळून आली.
या रोकडसंबंधी दुचाकीस्वार डी. के पाटील यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान पाटील यांनी हे पैसे आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई करण्यात आली.