व्यावसायीक स्पर्धेतून वाहन जाळले : भुसावळातील दोघांना बेड्या


जळगाव (10 नोव्हेंबर 2024) : व्यावसायीक स्पर्धेत टायमर लावत मालवाहू वाहन पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत चार संशयीतांची नावे निष्पन्न केली व त्यातील दोघांना अटक करण्यात आली. धीरज जितेंद्र राणे व कुणाल ढाके अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

खोक्यातील संसाधनांचा झाला स्फोट
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात मुख्य चौकात राहणारे सलीम बशीर खान यांचे वाहन (क्रमांक एम.एच.03 ईजी 3099) आहे. वाहनातून नेहमी औषधी आणि इतर साहित्याची वाहतूक केली जाते. वाहन चालक सलीम खान बशीर खान यांनी गुरुवार, 7 रोजी वाहनात माल भरला होता. शुक्रवारी सकाळी ते पाचोरा जाण्यासाठी निघाले असताना उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनातून धूर दिसू लागला.

वाहन उघडून पाहिले असता त्यात एका खोक्यात काही फटाके, सुतळी बॉम्ब, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, फॅन्सी टायमर बॉम्ब असे साहित्य होते. आगीमुळे वाहनातील सामान जळले असून लागलीच आग विझवण्यात आली. आग नेमकी कुणी लावली आणि त्यांचा उद्देश काय याबाबत पोलीस तपास करीत असताना जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात भुसावळातील संशयिताला पकडले व त्याच्या चौकशीतून अन्य तीन संशयीतांची नावे समोर आली. धीरज जितेंद्र राणे व कुणाल ढाके यांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

व्यावसायीक वादातून केले कृत्य
सलीम बशीर खान हे राणे ट्रान्सपोर्ट यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी स्वतःचे ट्रान्सपोर्ट सुरू केले. व्यावसायीक स्पर्धा वाढल्याने धीरज जितेंद्र राणे (28, रा.भुसावळ) याने वाहन जाळण्याचा कट रचला. भुसावळहून सर्व साहित्य खरेदी करीत त्याने ते पार्सल वाहनात ठेवले. रात्री 2.12 च्या सुमारास दुचाकीवर येऊन त्याने रिमोटने कोल्ड फायर फटाके जाळले. काही वेळाने वाहनाला आग लागली. पोलिसांनी माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा अंदाज घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव, महेश धायताड, भरत पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, अमोल ठाकूर, नरेंद्र ठाकरे, सुधीर साळवे, दत्ता पाटील, शिवाजी धुमाळ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धंडे, राजू जाधव, उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, प्रणव पवार आदींनी केली.


कॉपी करू नका.