महिलांना तीन हजार, बेरोजगारांना चार हजार : महाविकास आघाडीने जाहीरनामा केला जाहीर
मुंबई (10 नोव्हेंबर 2024) : पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार महाराष्ट्रात नवे औद्योगिक धोरणख, महिलांना दरमहा तीन हजार रुपये यासह अन्य घोषणा महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यातून केल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
रविवारी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
प्रत्येक कुटूंबाला तीन लाखांची मदत
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आमच्या पाच हमी महाराष्ट्रातील सर्वांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरतील. प्रत्येक कुटुंबाला अंदाजे 3 लाख रुपयांची वार्षिक मदत मिळणार आहे. आमची महालक्ष्मी योजना सर्व महिलांना आर्थिक मदत करेल. याअंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करणार.
शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम
खरगे म्हणाले की, जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. महिलांना वर्षभरात सहा सिलिंडर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपये असेल. राज्यात जात जनगणनाही होणार आहे. ’महाराष्ट्राचे भविष्य बदलण्याची ही निवडणूक आहे. महाविकास आघाडीने 100 दिवसांचा अजेंडाही जाहीर केला, असंही खरगे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटी
महालक्ष्मी- महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन
बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा
समानतेची गॅरंटी- जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन
50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार
कौटुंबिक संरक्षण- 25 लाखांपर्यंत आरोग्य विम्याचे आश्वासन
मोफत औषधांची सुविधा.
कृषी समृद्धी- शेतकर्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार
नियमित कर्ज परतफेडीवर 50,000 रुपयांचे प्रोत्साहन
तरुणांना वचन- बेरोजगारांना दरमहा चार हजारांची आर्थिक मदत