सावतर निंभोरा येथे वीज चोरी : नऊ जणांविरोधात गुन्हा
यावल (10 नोव्हेंबर 2024) : वरणगाव ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता यांनी आचेगाव कक्षांतर्गत येणार्या सावतर निंभोरा या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली होती. मोहिमेत वीज चोरी करतांना नऊ जण आढळले होते. नऊ जणांना त्यांनी चोरी केलेल्या युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या नऊ जणांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात शनिवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे वीज चोरी प्रकरण
वरणगाव ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता अतिश चंद्रकांत कुलकर्णी यांनी आचेगाव कक्ष अंतर्गत येणार्या सावतर निंभोरा या गावात 29 ऑगस्ट 2024 रोजी वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली होती. यावेळी रवींद्र श्यामराव कोळी, राजाराम सुपडू कोळी, लताबाई रामकृष्ण कोळी, गोकुळ लक्ष्मण कोळी, गणेश रमेश कोळी, शब्बीर शाह फतरू शाह, प्रवीण साहेबराव सपकाळे, अहमद शाह दगडू शहा फकीर व सिकंदर शाह फकीर या नऊ जणांनी 11 हजार 734 युनिट वीज चोरी केल्याने त्यांना दोन लाख 10 हजार 650 रुपये दंड आणि तडजोड रक्कम 24 हजार असे एकूण दोन लाख 34 हजार 650 रुपये दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या सर्व जणांनी दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता आतिश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी हा गुन्हा वरणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.