लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 लाख नोकर्या, महाराष्ट्राचा संपूर्ण विकास : भाजपाचा जाहीरनामा जाहीर
मुंबई (10 नोव्हेंबर 2024) : 25 लाख नोकर्या, महाराष्ट्राचा संपूर्ण विकास, शेतकर्यांसाठी भावांतर, कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये देण्याच्या घोषणा भाजपाने जाहीर नाम्यातून केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपला जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची उपस्थिती होती.
आघाडीचे मनसुबे सत्तेच्या तुष्टीकरणासाठी
’काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा सातत्याने अपमान केला आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शाह म्हणाले, मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे, ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी काही शब्द बोलण्यास सांगू शकतात का? विरोधाभास असताना आघाडीचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्या लोकांना ते सांगतील का? आघाडीचे सारे मनसुबे सत्तेसाठी तुष्टीकरणाचे, विचारसरणीचा अपमान करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी गद्दारी करणारे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला कळले तर बरे होईल, असा टोलाही शाह यांनी लगावला.
- भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
– ’लाडकी बहीण योजने’अंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाणार.
– शेतकर्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि मानधन 15,000 रुपये केले जाईल.
– वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार.
– 10 लाख विद्यार्थ्यांना मासिक 10,000 रुपये मदत रक्कम दिली जाईल आणि 25 लाख नवीन रोजगार संधी निर्माण होतील.
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये मासिक मानधन मिळेल.
– 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख ’लखपती दीदी’ निर्माण करण्याचे लक्ष्य.
– अक्षय अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दर महिन्याला मोफत रेशन मिळेल.