महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसेंच्या प्रचारार्थ उद्या मुक्ताईनगरात शरदचंद्र पवारांची सभा
मुक्ताईनगर (10 नोव्हेंबर 2024) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अॅड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता तालुका क्रिडा संकुल मैदान, मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीतर्फे ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीने दिले प्रदेशाध्यक्षपद
मुक्ताईनगर मतदार संघांत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी एकनाथराव खडसे या उमेदवार आहेत. 2019 विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. परंतु निवडून आल्यावर आमदार पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले.
या घडामोडी दरम्यान ऑक्टोबर 2021 मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता रोहिणी खडसे या पक्षाच्या उमेदवार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या काळात मुक्ताईनगर येथील पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमात रोहिणी खडसे यांचा पराभव आमच्यामुळे झाला असून, या निवडणुकीत पंधरा हजाराच्या मताधिक्याने रोहिणी खडसे यांना विजयी करू अशी घोषणा केली होती. पक्षाने सुद्धा रोहिणी खडसे यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून गेल्या निवडणुकीत या मतदारांनी चंद्रकांत पाटील यांना मतदान केले होते परंतु चंद्रकांत पाटील यांनी निवडून आल्यावर शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. नंतर ते शिंदे गटात गेले ही बाब या मतदारांच्या जिव्हारी लागली असून, त्याचा फायदा निश्चितच रोहिणी खडसे यांना होईल, अशी मतदारसंघात चर्चा आहे. उद्याच्या शरद पवार यांच्या सभेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे