सेना दलातील जवानाकडून मतपत्रिकेची गोपनीयता भंग : यंत्रणेकडून गुन्हा दाखल
जळगाव (11 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत रंग चढत असताना दुसरीकडे नोकरदारांसाठी पोस्टल मतदानही सुरू आहे मात्र सोशल मिडीयावर मतपत्रिका टाकून गोपनीयतेचा भंग केल्याचे प्रकरण सेना दलाच्या जवानाला भोवले असून त्याच्याविरोधात यंत्रणेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामनेर विधानसभा क्षेत्रामधील भारतीय सैन्यात असलेल्या जवानांना मतदानासाठी जामनेर मतदारसंघाचे डाक मतपत्रिका मतदान नोंदवण्यासाठी देण्यात येत आहे. पहुर येथील सेना दलातील जवान प्रमोद अशोक भामरे याने शनिवारी डाक मतपत्रिकाद्वारे मतदान नोंदवून ती दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी व्हाट्सअॅपच्या जामनेर सोशल ग्रुपवर पाठवली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी लेखी तक्रार केल्यावर निवासी नायब तहसीलदार व आचारसंहिता पथकांमधील प्रशांत रामराव निंबोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.