बोदवड शहरात धाडसी घरफोडी : सात लाखांचा ऐवज लंपास


बोदवड (11 नोव्हेंबर 2024) : शहरातील जिजाऊ नगरातील रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी हे सकाळी मुलीला भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत सुमारे सात लाखांचा ऐवज लांबवला. 10 रोजी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील भुसावळ रस्त्यावर जिजाऊ नगरात दिलीप रामदास डांगरे हे सेवानिवृत्त रेल्वे अभियंता वास्तव्यास आहेत. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता ते दीपावलीनिमित्त माहेरी आलेल्या मुलीला सोडण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर गेले असता चोरट्यांनी संधी साधली. घराच्या दरवाजेचे कुलूप कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत बेडरूममधील कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे डायमंडचे सहा लाख 42 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवली. डांगरे हे भुसावळ येथून परतल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बोदवड पोलिसांना माहिती दिलल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, बोदवड पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, उपनिरीक्षक सुमित पाटील यांनी पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर श्वान काही अंतरावर घुटमळले. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.