रवी राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव केला : अजित पवारांची स्पष्टोक्ती
मुंबई (12 नोव्हेंबर 2024) : रवी राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव करून घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांनी आतातरी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधातदेखील उमेदवार दिला आहे. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना समजून सांगायला हवे, अशा शब्दात अजित पवारांनी राणांवर निशाणा साधला. रवी राणांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
जनतेला नकारात्मक आवडत नाही
रवी राणा हे काहीही बोलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांनी समजून सांगायला हवे आणि महायुतीत अंतर पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला आहे. त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्या विरोधातदेखील वक्तव्य केले होते. जनतेला नकारात्मक बोललेले आवडत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे आणि माझ्या देखील बॅगा तपासल्या
परभणीमध्ये माझ्यादेखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यादेखील बॅगा तपासल्या गेल्या मात्र, अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी तक्रार करणे, आरोप करणे हे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या माध्यमातून असे होत असल्याचा आरोप विरोधक करत असतील तर आमच्या सोबत असणार्या पोलिसांच्या देखील बॅगा तपासा, असे आवाहन देखील त्यांनी केले. विरोधकांच्या आरोपाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.




