सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील नऊ लाखांची रोकड लांबवली : तळोद्यातील घटनेने शहरात खळबळ
तळोदा (13 नोव्हेंबर 2024) : शहरातील स्टेट बँकेतून 9 लाखाची रक्कम घेऊन बाहेर आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातून पिशवी हिसकावून दोन चोरट्यांनी पळ काढली. या घटनेनंतर चोरट्यांचा पाठलाग करणारा शिक्षकांच्या मुलाचा अपघात होऊन तो जबर जखमी झाला. दिवसाढवळ्या झालेल्या जबरी चोरीने शहरात खळबळ उडाली आहे.
पाळत ठेवून चोरीचा संशय
तळोदा तालुक्यातील तळवे येथील रहिवासी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक देविदास मंगा मराठे हे गत 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची सेवानिवृत्तीची रक्कम भारतीय स्टेट बँक शाखा, तळोदा येथे जमा झाल्यानंतर त्यांनी मुलगा संकेतसह बँक गाठत नऊ लाखांची रोकड काढली व ही रक्कम कापडी पिशवीत ठेवून बाहेर आले. मुलगा संकेत याच्या मोटरसायकलवर बस असताना बँकेाबहेर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी धूम स्टाईलवर दुचाकीवरून येत देविदास मराठे यांच्या हातातून पिशवी हिसकावली व पळ काढला.
पाठलागादरम्यान तरुण जखमी
देविदास मराठे यांचा मुलगा संकेत याने या प्रकारानंतर चोरट्यांचा पाठलाग केला व आधी चोरटे बँकेच्या आवारातून चिनोदा रोड वर आले व तेथून बिरसा मुंडा चौक मार्गे शहादा रस्त्याने भरधाव वेगाने जात असतांना त्यांच्या मागे असलेल्या संकेत याच्या शहादा रस्त्यावरील जैन शॉपी समोर खड्डा व त्यातील वाळू बाहेर आलेली असल्याने त्यावर मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात तो जबर जखमी झाला. त्याला पुढील उपचारार्थ नंदुरबार येथे हलविण्यात आले.
गुन्हे शाखेची धाव
पोलिसांना घटना कळवल्यानंतर एपीआय राजू लोखंडे व उपनिरीक्षक महेंद्र पवार हे पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कार्यवाही सुरू केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरक्षक किरण खेडकर यांनी सुद्धा भेट दिली. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी कॉलेज रोडवरील बँकेतून चार लाखांची रक्कम असलेली बॅग लांबवण्यात आली होती मात्र त्याचाही तपास लावण्यात यंत्रणेला यश आलेले नाही.