विधानसभा निवडणूक 2024 : मतदान ओळखपत्रासह 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य


भुसावळ (17 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा मतदार संघातील मतदारांना छायाचित्र व नावासह असलेल्या मतदार चिठ्या वाटपाचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्राखेरीज 11 पुरावे ग्राह्य मानले जाणार आहेत. मतदार चिठ्ठी हा पुरावा ग्राह्य मानला जाणार नसल्याने मतदारांनी आयोगाने ग्राह्य मानलेले ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती मिळावी म्हणून बीएलओंतर्फे त्यांना मतदान चिठ्ठी घरपोहोच दिली जात आहेत. या चिठ्ठीत मतदाराचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व छायाचित्राचा समावेश आहे. मतदानास येणार्‍या मतदारांची ओळख पटविण्यासाठी आयोगाने 12 कागदपत्रे ग्राह्य मानण्याचे सूचित केले आहे. या आदेशाचे पत्र 16 ऑगस्टला सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी केंद्रावर जाणार्‍या मतदाराने यातील एक ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. मतदारांनी सदर ओळखपत्र दाखवून मतदान करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

हे ओळखपत्र सोबत ठेवावे
मतदान करण्यासाठी जाणार्‍या मतदाराने सोबत आधारकार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबुक, पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचार्‍यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद सदस्य (खासदार), विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरीत केलेले विशेष ओळखपत्र, अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक आहे.


कॉपी करू नका.