भुसावळात लाडक्या बहिणींसह तरुणाईचे मतदान भाजपाच्या पथ्थ्यावर : यंदा मतदानात नऊ टक्के वाढ
निवडणूक निकालावर लागल्या पैजा : हॉटेल्ससह ढाब्यांवर निकालाचीच चर्चा : आमदार संजय सावकारेची विजयी होणार असल्याचा समर्थकांचा दााव
गणेश वाघ
भुसावळ (22 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 रोजी अत्यंत शांततेत मतदान पार पडले. या वेळच्या निवडणुकीत चुरस नसलीतरी नवतरुण मतदार तसेच लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला असून हे मतदान भाजपाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या पथ्थ्यावर पडणार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. असे असलेतरी प्रत्यक्षात ही बाब शनिवार, 23 नोव्हेंबरच्या निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नऊ टक्के मतदानाचा टक्का वाढला आहे. प्रशासनाकडून त्यासाठी करण्यात आलेली व्यापक जनजागृती व सरकारच्या विविधांगी योजनादेखील त्याचे मोठे कारण आहे.
गत वेळेपेक्षा नऊ टक्के अधिक मतदान
भुसावळ विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास सन 2009 मध्ये 50.91 टक्के, 2014 मध्ये 56.82 टक्के, 2019 मध्ये 48.95 टक्के मतदान झाले तर 2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 57.75 टक्क्यांवर पोहोचली. तीन लाख 16 हजार 307 मतदारांपैकी एक लाख 82 हजार 683 मतदारांनी (57.75 टक्के) हक्क बजावला. त्यात 94 हजार 846 पुरूष तर 87 हजार 825 स्त्री मतदार व 12 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. पुरूष मतदानाची टक्केवारी 58.60 तर स्त्री मतदारांची 56.87 टक्के असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
25 ते 30 हजार मतदार वाढले
मतदार जनजागृती अभियानांतर्गत प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनंतर युवा व महिलावर्गाची नोंदणी करण्यात आली व 25 ते 30 हजार मतदारांची संख्या वाढल्याने या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला. युवा मतदारांना प्रथमच मतदानाचा हक्क मिळाल्याने त्यांच्यात मतदानाविषयी मोठी उत्सुकता व कुतूहल दिसून आले.
लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलाांठी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. प्रति माह दिड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली तर महायुतीने ही रक्कम दोन हजार शंभर रुपये करण्याची घोषणा केली तर महाविकास आघाडीनेही या योजनेचा प्रतिसाद पाहता तीन हजारांवर रक्कम करण्याची घोषणा केल्याने महिला मतदार सुखावल्या. भुसावळ विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदान केलं आहे. महिलांनी केलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचे दिसून आले. महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं तसेच पहिल्यांदा मतदान करणारी तरुण पिढी कुणाच्या बाजूने कौल देणार? हे निकालाअंती कळणार असलेतरी भाजपा समर्थकांनी मात्र हे मतदान भाजपाच्या पथ्थ्यावर पडल्याचा दावा केला आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी वरील दोन घटकदेखील महत्वपूर्ण ठरले आहेत.
हॉटसिटीत अल्प तापमानामुळे गर्दी टळली
लोकसभा निवडणूक मे महिन्यात झाल्याने त्यावेळी उन्हाचा फटका मतदारांना जाणवला मात्र विधानसभा निवडणुकीवेळी हिवाळा असल्याने व बुधवार 31 अंशावर असल्याने गारठा निर्माण झाल्याने सर्वच मतदान केंद्रावर रांगा दिसल्या नसल्यातरी सकाळीच मतदार बाहेर पडले व त्यांनी हक्क बजावला.
व्यापक जनजागृती, मतदारही वाढले : निता लबडे
मतदार नोंदणी संदर्भात व्यापक जनजागृतीमुळे सुमारे 30 हजारांवर मतदार वाढले. त्यात युवा वर्गासह महिलावर्गाचा सहभाग अधिक होता शिवाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पथनाट्य, सायकल रॅलीतून मतदानाविषयी प्रबोधन करण्यात आले व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेवून त्यांना पालकांसह शेजार्यांना मतदानासंदर्भात प्रोत्साहित करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने त्याचा परिणाम मतदानाची टक्केवाढ होण्यात झाला, असे सहा.निवडणूक अधिकारी निता लबडे म्हणाल्या.