ड्रॅगनचा ग्रॅण्ड मास्टर पराभूत : बुद्धीबळात भारताचा ‘डी.गुकेश’ विश्वविजेता
Dragon’s Grand Master Defeated: India’s ‘D. Gukesh’ Becomes World Chess Champion वृत्तसंस्था । सिंगापूर (12 डिसेंबर 2024) : सिंगारपूरातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली, पण अखेरला 18 वर्षीय गुकेशने सामना आपल्या नावावर केला.
अखेरच्या फेरीत सामना नावावर
सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत रंगली. सामन्याच्या शेवटच्या फेरीत डिंगने एक चूक केली अन् तिथेच गुकेशने संधी साधत सामना आपल्या नावावर केला. गुकेशने चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत 7.5 – 6.5 अशा फरकाने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा गुकेश, विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या विजयाचे बक्षीस म्हणून गुकेशला 18 कोटी रुपयेही मिळणार आहेत.





