पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस अन् झटापटीत गोळीबार : चौघे धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Rain of money and random shooting in Palasner forest: Four in the net of Dhule Crime Branch धुळे (16 डिसेंबर 2024) : शिरपूर तालुक्यातील पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार घडत असताना वादावादी झाली व संशयीतांनी यावेळी गोळीबार केल्याने सलईपाड्यातील दोघे जखमी झाले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे गुन्हे शाखेने याप्रकरणी चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपी जळगाव जिल्ह्यातील तसेच बर्हाणपूर व खंडवा भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय घडले नेमके ?
सलईपाडा भागातील तक्रारदारांना आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत पळासनेरच्या जंगलात बोलावले. विधी सुरू झाल्यानंतर पैसे नेण्यावरून वादावादी सुरू झाली व आरोपींनी यावेळी गोळीबार केल्याने दोघे जखमी झाले. त्यांच्या छातीला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून चौकशी सुरू केली. याप्रकरणी काल रात्री उशिरा शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या सहपथकाने थेट मध्यप्रदेश गाठले. रात्रभर शोध मोहीम राबवून चार संशयित आरोपींना ताब्यात अटक करण्यात आली तर एक पसार आहे.