पैश्यांचा पाऊस न पडल्याच्या वादातून गोळीबार : मध्यप्रदेशातील चौकडीला बेड्या
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : धुळे गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी
धुळे (16 डिसेंबर 2024) : पैशांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून दिड लाख उकळण्यात आले मात्र पैशांचा पाऊस पडलाच नाही. त्यानंतर दिलेले पैसे परत मागण्याच्या वादातून संशयीताने गोळ्या झाडल्याने दोघे जखमी झाले. हा थरार पळासनेरच्या जंगलात 14 रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. धुळे गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत मध्यप्रदेशातील चौकडीच्या मुसक्यात बांधल्या आहेत. आरोपींच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या आरोपींना अटक
गणेश रामदास चौरे (30, बर्हाणपूर), रतीलाल गणपत तायडे (50, बर्हाणपूर), अंकित अनिल तिवारी (25, खंडवा), विशाल करणसिंग कश्यप (39, खंडवा) यांना अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
गुलजारसिंग पारसिंग पावरा (बोराडी, ता.शिरपूर) याने पैशांचा पाऊस पाडतो म्हणत गणेश रामदास चौरे यास सांगितल्याने चौरेसह साथीदार शिवा सीताराम पावरा हे पळासनेरच्या जंगलात 14 रोजी रात्री साडेआठ वाजता दाखल झाले. गणेशने दिड लाख रुपये गुलजारसिंगला दिले मात्र पैशांचा पाऊस पडलाच नाही व यावेळी दिलेले पैसे परत मागण्यावरून वाद झाला. 50 हजार रुपये परत मिळत असल्याचे पाहून वादात अधिक भर पडली. यावेळी संशयीत गणेशसोबत असलेल्या एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याने दोघे जखमी झाले. धुळ्यातील सिद्धेश्वर हॉस्पीटलमध्ये जखमींना आणल्यानंतर पोलिसांनी जवाब नोंदवत कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, संजय पाटील, पवन गवळी, आरीफ पठाण, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, नितीन दिवसे, मयूर पाटील, संजय सुरसे, शिरपूर तालुक्याचे धनराज गोपाल, इसरार फारूखी, मनोज नेरकर, गुरुदास बडगुजर आदींच्या पथकाने केली.