वराडसीमजवळ लक्झरीला अपघात : सुरतची महिला प्रवासी ठार
Luxury car accident near Varadsim: Surat woman passenger killed जळगाव (24 डिसेंबर 2024) : भरधाव लक्झरीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात महिला प्रवाशाचा मृत्यू झाला तर लक्झरीतील 10 वर प्रवासी जखमी झाले. हा अपघात धरणगाव तालुक्यातील वराडसीम गावाजवळ मंगळवारी, 24 डिसेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.
नियंत्रण सुटल्याने अपघात
गुजरातच्या सुरत येथून निघालेली लक्झरी बस (क्रमांक जी.जे.01 डी.वाय.5502) ही एरंडोलमार्गे मलकापूरकडे निघाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील वराडसीम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका बाजूला झाल्याने चालकाने लक्झरी बसवरील नियंत्रण गमावताच लक्झरी डिव्हायडर ओलांडून पलीकडे जाऊन पलटी झाली. या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे (30, रा.भीम नगर, उधना, गुजरात) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर विठ्ठल अमृत कोगदे (75, रा.पळशी, ता.बाळापूर, जि.अकोला), सोपान नारायण सपकाळ (54, रा.नरवेल, ता.मलकापूर), प्रशांत गजानन धांडे (33, रा.नरवेल, ता.मलकापूर), विश्वनाथ नामदेव वाघमारे (65, रा.वरणगाव) यांच्यासह इतर 8 ते 10 प्रवासी हे जखमी झाले.
पतीच्या उपचारासाठी निघालेल्या विवाहितेचा मृत्यू
कविता नरवाडे आपल्या पतीच्या उपचारासाठी नांदुरा येथील भावाकडे जात होत्या. त्यांच्याशी संबंधित कुटुंबातील इतर सदस्यांना या अपघातामुळे मोठा मानसिक धक्का बसला. विवाहितेच्या पश्चात पती सिद्धार्थ नरवाडे, मुलगा राज, दोन मुली खुशी आणि तनु असा परिवार आहे. विवाहितेची अपघाती मृत्यूप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांनी मदत करून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.