राष्ट्रवादीत धुसफूस : जयंत पाटलांनी सांगून टाकले ; थांबा राजीनामाच देतो !


मुंबई (10 जानेवारी 2025) : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून ते राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपर्क साधला जात असल्याच्या बातम्याही आल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती आहे.

काय म्हणाले, जयंत पाटील
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी करणार्‍या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी सुनावले आहे. पुढच्या दोन दिवसांत प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते दिली त्याचा डेटा द्यावा, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. पक्ष चालवणे काही सोपे काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागते. जोरदार भाषण करून उपयोग नाही. डोके शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचे असते. मी एकटा कितीवेळ काम करायचे? आठ दिवसांचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो.

निवडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्या. कुणी काय काम केले, याची सविस्तर माहिती द्या. त्यानंतर प्रदेशाध्यपदावरुन बाजूला होतो. बोलणे सोपे असते, चांगला माणूस मिळणे अवघड असते, या शब्दांत जयंत पाटील यांनी पदाधिकार्‍यांना खडसावून सांगितले.

अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवलेय?
जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याचे सांगितले जाते. याबाबत सातत्याने होणार्‍या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही, जायचे असते तर यापूर्वीच गेलो असतो, असे पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

 


कॉपी करू नका.