धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई : धुळ्यात डिझेल इंजिनासाठी लागणारे बनावट डीईएफ रसायन जप्त
शिरपूर तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा
Fake DEF chemical used for diesel engines seized in Dhule धुळे (10 जानेवारी 2025) : बीएस- 6 डिझेल वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डीईएफ (डिझेल एक्झॉस्ट फ्लुईड) रसायन धुळे तालुका पोलिसांनी एका वाहनातून डिसेंबर महिन्यात पकडले होते. कंपनीने याबाबत खातरजमा केल्यानंतर जप्त केलेले डीईएफ हे बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने शिरपूर तालुक्यातील तीन संशयीतांविरोधात धुळे तालुका पोलिसात बुधवार, 8 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
धुळे तालुका निरीक्षक अभिषेक पाटील यांना डिसेंबर महिन्यात एका वाहनातून बीएस 6 मानके असलेले डिझेल इंजिनासाठी लागणारे बनावट रसायन नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहन जप्त करण्यात आले होते. डिसेंबर 2024 मध्ये ही कारवाई झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ईआयपीआर कंपनीचे तपास अधिकारी कृष्णा देविप्रसाद कनोजिया (50, मुंबई) यांनी जप्त केलेले डीईएफ बनावट असल्याचे अहवाल पोलिसांना दिल्यानंतर बुधवारी पोलिसांनी योगेश धनगर (गरताड, ता.शिरपूर), भूपेश पोपट धनगर (25, असली, ता.शिरपूर), प्रवीण राजू मालवे (25, कळमसरे, ता.शिरपूर) यांच्याविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीचे महेंदा पिकअप वाहन (एम.एच.04 जी.सी.8387) तसेच 60 हजार 600 रुपये किंमतीचे बनावट डिईएफ जप्त केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका निरीक्षक अभिषेक पाटील, राकेश मोरे, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे आदींच्या पथकाने केली.