एकाच कुटूंबातील पाच जणांची हत्या
नवी दिल्ली (10 जानेवारी 2025) : उत्तरप्रदेशातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटूंबातील हत्या झाल्याचे हे प्रकरण आहे. पोलिसांनी सांगितले की, मेरठमधील लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुहेल गार्डन कॉलनीत एका घरात पाच मृतदेह पडले होते. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून त्यातील एक मुलगी तर अवघी वर्षभराची आहे. मुलींचे मृतदेह बेडच्या आत असलेल्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले.
मृतांमध्ये मोईन, आसमा आणि त्यांच्या तीन मुली अफशा (8), अजीजा (4) आणि अदीबा (1) यांचा समावेश आहे. मृत मोईन हे मिस्त्री म्हणून काम करत होते. आरोपींनी मोईन आणि आसमा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खोलीतच टाकला होता, तर त्यांच्या मुलींची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह त्याच खोलीतील बेडमधील बॉक्समध्ये ठेवले होते. यामधील लहान मुलीचा मृतदेह गोणीत भरून बेडमध्येच ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकर्यांनी घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.
दरम्यान, गुरूवारी सकाळपासून नातेवाईक आणि मोईन यांचा भाऊ त्यांना फोन करत होते. पण फोन उचलले जात नव्हते. शेजार्यानेही मोईन यांच्या कुटुंबातील एकही सदस्य दिसला नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोईन यांचा भाऊ घरी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की घराला बाहेरून कुलूप लावलेले आहे. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस दरवाजाचा कुलूप तोडून आत गेले. यावेळी हे हत्याकांड सर्वांनाच धक्का बसला.