बीड सरपंच हत्येतील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई : मुंडेचा समर्थक वाल्मीक कराडवर मात्र खंडणीचाच गुन्हा
बीड (11 जानेवारी 2025) : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणात मोठी अपडेट बातमी टीव्ही 9 ने दिली असून या गुन्ह्यातील आरोपींना मोक्का लागला आहे तर मंत्री मुंडे समर्थक वाल्मीक कराडवर मात्र खंडणीचाच गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
एक संशयीत अद्यापही पसार
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली. सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल असून त्यापैकी 6 जणांवर आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा कसून शोध सुरू आहे. सीआयडीने या प्रकरणाशी निगडीत असणार्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा खास विश्वासू सहकारी आहे.





या आरोपींवर मकोका?
एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या 7 जणांवर मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराडवर कोणता गुन्हा?
धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराडवर सध्या आवादा पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सध्या मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही. पण बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात वाल्मीक कराडवरही या कायद्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मकोका गुन्ह्यात किमान पाच वर्षांची शिक्षा व पाच लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते.
