बॉलिवूड हादरले : अभिनेता सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूहल्ला
मुंबई (16 जानेवारी 2025) : मुंबईच्या खार भागात वास्तव्यास असलेला सिने अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने चाकूने सहा वार केल्याची घटना मध्यरात्री घडली. हल्लेखोर पसार झाला असून हल्ल्यामागे चोरी हे कारण असल्याचा प्राथमिक संशय आहे. सैफवर हल्ल्यानंतर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली व प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
काय घडले नेमके
मुंबईतील खार येथील सैफच्या निवासस्थानी अज्ञाताने सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू लागला आहे. सैफला लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफवर सहा वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा खोल आहेत. पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे. डॉ.नितीन डांगे (सर्जन), डॉ. लीना जैन (सल्लागार प्लास्टिक सर्जन), डॉ. निशा गांधी (अनेस्थेशिया विशेषज्ञ), डॉ. कविता श्रीनिवास (इंटेन्सिव्हिस्ट) आणि डॉ. मनोज देशमुख (सल्लागार रेडिओलॉजिस्ट) त्यांच्यावर उपचार करत आहेत.
सैफच्या टीमच्या अधिकृत निवेदनात सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीण अरियामा फिलिप ऊर्फ लीमा हीदेखील जखमी झाली आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की अशा परिस्थितीत आम्हाला साथ द्यावी. ही पोलिसांची बाब आहे. आम्ही तुम्हाला अपडेट ठेवू.
डीसीपी गेडाम दीक्षित म्हणाले की, सैफ अली खान फॉर्च्यून हाईट्स, खार येथे राहतो. बुधवारी रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरात घुसला आणि त्याने मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा अभिनेत्याने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला आणि तो जखमी झाला.