नंदुरबार शहरात अपघातानंतर दोन गटात दगडफेक
नंदुरबार (20 जानेवारी 2025) : नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात रविवारी सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र रात्री आठ वाजेनंतर शहरात विविध अफवांचे पेव फुटले. त्यामुळे शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली.
अश्रूधुराच्या फोडल्या नळकांड्या
शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यावेळीही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या. तसेच जमावावर सौम्य लाठीमारही केला. यामुळे जमाव पांगवण्यास मदत झाली.
पोलीस अधीक्षकांची धाव
संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्वतः पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलिस अधीक्षक कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
संशयितांवर गुन्हे दाखल
एसपी श्रवण एस दत्त म्हणाले की, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, परिणामी हिंसाचार इतर भागात पसरला नाही. या प्रकरणी कोणत्याही मालमत्तेचे किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. आम्ही काही संशयितांना ओळखले आहे.