बोदवड परिसर सिंचन योजनेच्या कामाची गती मंदावली !

शेतकर्‍यांना नवसंजीवनी ठरणार्‍या योजनेला गती ? : शासन बेदखल : लोकप्रतिनिधींनी घ्यावी दखल


सचिन महाजन

Bodwad Area Irrigation Scheme जामठी (31 जानेवारी 2025) : जळगावसह बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार्‍या बोदवड परिसर सिंचन योजनेच्या कामाला ब्रेक लागल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील 33 हजार 668 हेक्टर तर बुलडाणा जिल्ह्यातील 19 हजार 781 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. 2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले मात्र तेव्हापासून शासनाकडून अल्पशा हालचाली झाल्या मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात केव्हा होणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

दोन टप्प्यात होणार काम
बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे काम दोन टप्प्यांमध्ये नियोजित आहे. त्यात पहिल्या टप्यात पंप गृह अ, पंप गृह ब, जुनोने साठवण तलाव आणि उद्धरण नलिका यांचा समावेश आहे. या टप्प्यात 14 हजार 994 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. दुसर्‍या टप्प्यात 38 हजार 455 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाईल. तापी नदीच्या बॅक वॉटरपासून पाणी उपसा करून पूर्णा नदीकाठी खामखेडा येथे जॅकवेल बांधण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 2500 मिमी व्यासाच्या पाईप लाईनद्वारे जुनोने तलावात हे पाणी सोडले जाईल. दुसर्‍या टप्प्यात 1850 मिमी पाईप लाईनद्वारे जामठी साठवण बंधार्‍यात पाणी पोहोचवले जाईल.

अनेक वर्षांपासून प्रकल्प रखडला
शेतकर्‍यांना नवसंजीवनी ठरणारी बोदवड परिसर उपसा सिंचन योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यामुळे 200कोटी रुपयांची या प्रकल्पासाठी तरतूद झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हा निधी मंजूर होण्यामुळे प्रकल्पाच्या कामाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. बोदवड तालुक्याचा अवर्षणग्रस्त पट्टा या योजनेमुळे हिरवागार होणार आहे मात्र काम गतीमान केव्हा होईल याकडे सर्व शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

अवर्षणग्रस्त शेतकरी अद्यापही प्रतिक्षेतच
अवर्षणामुळे त्रस्त असलेल्या या भागातील शेतकर्‍यांसाठी हा प्रकल्प सुरू झाल्यास वरदान ठरेल. बंद पाईपद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. बंद पाईपद्वारे पाणीपुरवठ्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. साठवण तलाव व बंधारे बांधण्याच्या योजनांमुळे पाणीपुरवठा अधिक सुकर होईल. यामुळे जलसंधारण व सिंचन व्यवस्थापन सुधारेल. बोदवड उपसा सिंचन हा प्रकल्प जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना अजून किती दिवस प्रतिक्षा करावी लागेल अद्याप तरी शेतकर्‍यांपुढे प्रश्नः चिन्हच आहे.

अशी असेल योजना
मुक्ताईनगरजवळ तापीचे बॅक वॉटर असलेल्या पूर्णा नदीच्या काठी खामखेडा येथे इंटेक चॅनल जॅकवेल बांधले जाईल. जॅकवेलमधून पाणी उपसा करून जॅकवेल पासून 2500 मिमीच्या दोन पाईप लाइन द्वारे पहिल्या टप्प्यात जुनोने येथे साठवण तलावात पाणी सोडले जाईल. दुसर्‍या टप्प्यात 1850 मिमी व्यासाच्या पाईप लाईनद्वारे जामठी येथे साठवण बंधार्‍यात पाणी सोडले जाईल. दोन्ही ठिकाणी मातीचे साठवण बंधारे बांधणे प्रस्तावित आहे. साठवण बंधार्‍या मधून जळगाव जिल्ह्यातील 63 टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील 37 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. बंधार्‍यामधून बंद पाईप लाईन द्वारे शेतापर्यंत पाणी वितरित होणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !