जळगावात बुरखा घालून सराफा दुकानात दागिण्यांची चोरी : मालेगावातील महिलांना अटक
शनीपेठ पोलिसांची कामगिरी ः न्यायालयीन कामानिमित्त आल्यानंतर केली हात की सफाई
Jewellery theft at a bullion shop in Jalgaon while wearing a burqa : Women from Malegaon arrested जळगाव (6 फेब्रुवारी 2025) : पोलिसांच्या रेकॉर्डवरील महिला जळगावात न्यायालयीन कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी ज्वेलर्स दुकानातून हात की सफाई दाखवत दागिणे लांबवले. शनीपेठ हद्दीत घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलांचा माग काढत त्यांना अटक करण्यात आली व एक लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी दिली.
शनीपेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव शहरातील सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय 69) यांच्या गोयल ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिलांनी 28 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता दुकानातून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होता. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आल्यानंतर संशयीत महिला चोरी करून सुभाष चौक, घानेकर चौकातून पायी जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या बळीराम पेठ परिसरात एका वाहनात बसताना दिसल्या.
महिलांचे मालेगाव कनेक्शन
सीसीटीव्हीच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक (एम.एच.14 डी.एफ.5703) असल्याचे निष्पन्न होताच चालक आसीफ मो.रफिक अहमद अन्सारी (22, रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याशी संपर्क साधला असता त्याने 28 जानेवारी रोजी सईदा रहमतुल्ला अन्सारी (41) व इरफाना बानो अल्लाह बक्ष शेख (44, मालेगाव) या दोन महिलांना जळगाव येथे भाड्याच्या गाडीने आणले होते, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांना मालेगावातून अटक करीत त्यांच्याकडून एक लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
महिला सराईत गुन्हेगार
या दोन्ही महिलांवर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. महिला न्यायालयीन कामानिमित्त जळगावी आल्या व परतीच्या मार्गावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची अधिक चौकशी केली असता दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे सात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
या पथकाने केली कारवाई
शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साजीद मंसुरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार विजय खैरे, नाईक किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, काजल सोनवणे यांच्या पथकाने केली.