यावलला बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला 85 विद्यार्थ्यांची दांडी
सात केंद्रावर बुधवारी तीन हजार 241 विद्यार्थ्यांनी सोडवला पेपर
यावल (13 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर मंगळवारी बारावी इंग्रजीचा पेपर उत्साहात पार पडला. 11 ते दुपारी 1 या वेळेत मराठी व उर्दू विभागातील एकूण तीन हजार 326 विद्यार्थी पेपरासाठी प्रवेशीत होते. तीन हजार 241 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर सोडवला तर पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला तब्बल 85 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. कॉपी प्रकार आणी स्थानिक पातळीवरील दबाव टाळण्याकरीता परीक्षा केंद्रावरील स्थानिक शिक्षकांची नेमणूक या वेळी केली नव्हती.
85 विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेपरला दांडी
यावल तालुक्यातील सात परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून एकूण इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. या सात परीक्षा केंद्रांना दोन कस्टडी होत्या. यावल कस्टडीत चार तर फैजपूर कस्टडीत तीन असे सात परीक्षा केंद्र यावल तालुक्यात आहे. यावल कस्टडी प्रमुख गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके व फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणुन अजित तडवी यांची नियुक्ती आहे. सात केंद्रावर एकूण इंग्रजी विषयाच्या पेपराकरीता तीन हजार 326 विद्यार्थी प्रवेशीत होते. सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत मराठी व उर्दू विभागातील विद्यार्थी इंग्रजीचा पेपर सोडवण्याकरीता तीन हजार 241 विद्यार्थी हजर राहिले तर तालुक्यातील 85 विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली. परीक्षा केंद्रावर गस्ती पथक प्रमुख तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या वतीने लक्ष ठेवण्यात आले. परीक्षा केंद्राबाहेर यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

शिक्षकांची अदला-बदली
कॉपीचा प्रकार टाळण्याकरीता व स्थानिक शिक्षकांवर स्थानिक नागरीकांचा दबाव टाळण्याकरीता शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांची अदला-बदली करण्यात आली होती. यावल केंद्रावर चिंचोली, चिंचोली केंद्रावर यावल, सांगवी केंद्रावर यावल व यावल शहरातील एका केंद्रावर सांगवी येथील शिक्षकांची नियुक्ती केली होती.
भुसावळात 24 विद्यार्थ्यांनी मारली दांडी
भुसावळ शहरातील सर्व सहा केंद्रांवर इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी, भुसावळ गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या पथकांनी भेटी दिल्या. बी. झेड, के. नारखेडे, डी. एल. हिंदी, बियाणी व नाहाटा या प्रमुख केंद्रांवर यंदा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पहिल्या व दुसर्या माळावरील वर्ग खोल्यांमध्ये करण्यात आली. केंद्रावर स्थिर व बैठे पथकही असल्याने यंदा दरवर्षाच्या तुलनेत कॉपींचा सुळसुळाट दिसला नाही. शहरातील सहा व वरणगावातील एक अशा सात केंद्रांवर इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी दोन हजार 714 विद्यार्थी प्रविष्ठ होते. यापैकी दोन हजार 690 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उर्वरित 24 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. शहरातील परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा वाजेपासूनच पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली.






