धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरण : 11 इसमांची ओळख पटवण्यात यश


Dhule Rest House incident : 11 suspects identified धुळे (17 जून 2025) : धुळ्यातील शासकीय रेस्ट हाऊस गुलमोहरच्या 102 क्रमांकाच्या खोलीत सापडलेल्या एक कोटी 84 लाखांच्या घबाड प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. घटनेच्या दिवशी रेस्ट हाऊस आवारात आलेल्या 11 जणांची ओळख पटवण्यात यश आले असून तीन गाड्यांचीही यंत्रणेने ओळख पटवली आहे. पोलिसांच्या तीन पथकांनी धुळ्यासह नंदुरबारमधील शासकीय कार्यालयात जावून ‘त्या’ 11 जणांची ओळख पटवत त्यांचा जाब-जवाब नोंदवण्यास सुरूवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे नेमके प्रकरण
धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या कक्षात तब्बल एक कोटी 84 लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोलनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.


या प्रकरणात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पाटील यांचे निलंबनही करण्यात आले असून, या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची घोषणा केली आहे.

11 जणांची पटली ओळख
पोलिसांनी रेस्ट हाऊस आवारात आलेल्या 11 जणांची ओळख पटवली आहे. त्यासाठी तीन पथकांनी धुळ्यासह नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांमध्ये जावून संबंधितांची ओळख पटवली तसेच त्यांना फुटेज दाखवून त्यांचे स्टेटमेंट (बयाण) नोंदवण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणार्‍या तीन गाड्यांची ओळख पटली असून 20 रोजीचा डाटादेखील लवकरच प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !