कंडारी परिसरात बिबट्याची दहशत : गाढवाची केली शिकार


भुसावळ (4 मार्च 2025) : कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालय मार्गावर सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान बिबट्या आढळला तर मंगळवारी सकाळी या बिबट्याने केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या रेल्वेच्या भागात एका गाढवाची शिकार केली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सकाळी पाहणी केली. मृत गाढवाची शिकारच झाल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले.

रात्री राबवले सर्च ऑपरेशन
सोमवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान दरम्यान सुभाष नगर केंद्रीय विद्यालय रोडवर काही नागरिकांना बिबट्या आढळला. यानंतर ही बाब कंडारी गावात पसरली. पोलीस पाटील रामा तायडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस, आयुध निर्माणी, केंद्रीय विद्यालय कर्मचारी तसेच गावात माहिती दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले. कुर्‍हा येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी रात्री सर्च ऑपरेशन राबवले मात्र काही आढळून आले नाही.

शिकारीमुळे अधिवासावर शिक्कामोर्तब
मंगळवारी सकाळीही परिसरात बिबट्याची दहशत होती. याच दरम्यान सकाळी काही नागरिकांना केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या रेल्वे विभागाच्या जागेवर मृत गाढव आढळले. ही माहितीही वनविभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यांनी या मृत गाढवाची पाहणी केल्यानंतर या प्राण्याची शिकार झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे कंडारी परिसरात बिबट्याचा अधिवास असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

पिंजरा लावण्यासाठी नागरिकांची मागणी
कंडारी, मिलीटरी स्टेशन, आयुध निर्माणी, केंद्रीय विद्यालयाचा परिसर या भागात घनदाट झाडी असून शेजारीच तापीचे पात्र आहे. यामुळे याच परिसरात बिबट्याच्या वास्तव्याबाबतची माहिती कुर्‍हा येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांना देण्यात आली. मंगळवारी सकाळीही वनविभागाने भागांची पाहणी केली. काही ठिकाणी ढसेही आढळून आल्याचे सांगण्यात आले. यामुळे वनविभागाने पिंजरा बसवावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान अधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने या पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.
WhatsApp Group