13 हजारांची लाच भोवली : धुळे प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


Bribe worth Rs 13,000 : Revenue assistant at Dhule provincial office caught by ACB धुळे (10 मार्च 2025) : अवैध वाळूच्या ट्रॅक्टरवर आकारलेली दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी 13 हजारांची लाच स्वीकारताना धुळे उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ (39, रा.प्लॉट.नं.19-अ, बिजली नगर, नकाणे रोड, धुळे) यास धुळे एसीबीने सोमवारी सायंकाळी अटक केली. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
26 वर्षीय तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने मौजे कोकले, ता.साक्री शिवारात 5 मार्च रोजी पकडून तहसील कार्यालय, साक्री येथे जमा केले होते. ट्रॅक्टरवर आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी, धुळे यांच्याकडून कमी करून देण्यासाठी 15 हजारांची लाच आरोपी वाघ याने 7 व 10 मार्च रोजी मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. पडतळणीनंतर सोमवारी सायंकाळी सापळा रचून संशयीत वाघ यास उपविभागीय कार्यालयातच लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. संशयीताविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे. हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.