धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
स्थळ निरीक्षणासाठी आठ हजारांची लाच भोवली ः लाचखोर हादरले

ACB’s big action in Dhule: Two people including an inspector from the Food and Drug Administration are caught in the ACB’s net धुळे (11 मार्च 2025) : दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (44, फ्लॅट नंबर 202, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपिंच्या मागे, द्रोपती नगर, जळगाव) व खाजगी इसम तुषार भिकचंद जैन (36 मराठी गल्ली, शिरपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
34 वर्षीय तक्रारदार यांना शिरपूर येथे पशू पक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी निरीक्षक किशोर देशमुख यांची धुळे कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे संशयीत तुषार जैन सोबत निरीक्षण करतील, असे सांगितले व 4 मार्च रोजी परीक्षण केल्यानंतर जैन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. 4 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व याच दिवशी आरोपींनी दुकानाचे स्थळ निरीक्षण केले. मंगळवार, 11 रोजी तुषार जैन याने आठ हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला व तुषार जैन याने लाच स्वीकारताच आरोपी देशमुख यासदेखील कार्यालयातून अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, प्रशांत बागुल, बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.


