सावधान तुमचीही होवू शकते फसवणूक : केवायसी अपडेट करण्याची थाप देत चोपड्यातील शेतकर्याला सहा लाखांचा गंडा

जळगाव (12 मार्च 2025) : बँकेतून बोलतोय, तुमचे केवायसी अपडेट करून देतो, अशी थाप देत सायबर ठगाने बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाइन 6 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
42 वर्षीय तक्रारदार, चोपडा तालुक्यातील रहिवासी असून शेती करतात. शनिवारी (8 मार्च) बँक ऑफ महाराष्ट्रमधून शर्मा बोलतोय, असे सांगत शेतकर्याच्या व्हाट्सप मोबाइलवर संपर्क साधला. तुमची केवायसी अपडेट करून देतो. त्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर लिंक पाठविली. या खात्यातून सायबर ठगाने सहा लाख 17 हजारांची रक्कम ऑनलाइन स्वीकारून फसवणूक केली. दरम्यान, शेतकर्याने संपर्क साधला असता ठगाने प्रतिसाद दिला नाही. बँक खात्यातून ऑनलाइन रक्कम गेल्याचा मामला उघड होताच शेतकर्याने सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी शर्मा नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.


