बाप रे ! धुळ्यातील लाचखोर अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांच्या घरात एसीबीच्या हाती लागले लाखोंचे घबाड

18 लाखांचे सोने, 32 लाखांची रोकड जप्त : बेहिशेबी मालमत्ता पाहून एसीबीचे अधिकारीही झाले अवाक


धुळे (12 मार्च 2025) : दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (44, फ्लॅट नंबर 202, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपिंच्या मागे, द्रोपती नगर, जळगाव) व खाजगी इसम तुषार भिकचंद जैन (36 मराठी गल्ली, शिरपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. लाचखोर देशमुखाच्या जळगावातील घराची स्थानिक एसीबीने झडती घेतल्यानंतर तब्बल 31 लाख 30 हजार शंभर रुपयांची रोकड, 17 लाख 46 हजार 100 रुपयांचे दागिने व 22 हजार 760 रुपये किंमतीचे चांदीने दागिणे जप्त करण्यात आले.

असे आहे लाच प्रकरण
34 वर्षीय तक्रारदाराला शिरपूर येथे पशू पक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाचखोर अधिकार्‍याने आठ हजारांची लाच मागितली व एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी खाजगी पंटर जैन यास पारोळा चौफुलीवर पकडण्यात आले व त्यानंतर अधिकारी देशमुख यासदेखील अटक करण्यात आली.

घर झडतीत आढळले घबाड
आरोपी किशोर देशमुख हा जळगावातील रहिवासी असल्याने ट्रॅपनंतर जळगाव एसीबीने आरोपीच्या घराची झडती घेतली. लाचखोर देशमुखाच्या जळगावातील घरातून तब्बल 31 लाख 30 हजार शंभर रुपयांची रोकड, 17 लाख 46 हजार 100 रुपयांचे दागिने व 22 हजार 760 रुपये किंमतीचे चांदीने दागिणे जप्त करण्यात आले तर धुळ्यातील घरातून 75 हजार 810 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.


कॉपी करू नका.