महाबोधी महाविहार मुक्तीसाठी कुर्हा चौकीवर मोर्चा

कुर्हाकाकोडा (15 मार्च 2025) : बुद्धगया येथील महाबोधी महाविहारावरील महंतांचा अवैध कब्जा काढून महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी कुर्हाकाकोडा येथे भव्य शांती मोर्चा काढण्यात आला.
पोलीस प्रशासनाला निवेदन
बिहार राज्यातील बुद्धगया येथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती. त्याठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार बांधले आहे. जागतिक बौद्धांचे श्रद्धा स्थान असलेल्या महाविहारावर ब्राम्हणांचा कब्जा आहे. बिहार सरकारने 1949 मध्ये बनवलेल्या बीटी अॅक्टनुसार हा कब्जा असून महाविहार प्रबंधन कमिटी (बीटीएमसी) मध्ये सुद्धा ब्राम्हण सदस्य आहेत. हिंदूंच्या मंदिराचे प्रबंधन हिंदू करतात. मुस्लिमांच्या मशिदीचे प्रबंधन मुस्लिम करतात मग बौद्धांच्या महाविहारात इतर धर्मियांचे काय काम ? असा सवाल उपस्थित करत ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे संयोजक आकाश लामा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर मुक्ती आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 12 फेब्रुवारी पासून महाबोधी महाविहार समोर बौद्ध भिक्खू उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सकल बौद्ध समाज कुर्हा वढोदा डोलारखेडा परिसराच्या वतीने कुर्हा येथे बुधवारी भव्य शांती मोर्चा काढण्यात आला. हजारो बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन सामील झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती जवळून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भन्ते संघपाल यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कुर्हा पोलीस दुरक्षेत्र कार्यालयात नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, मंडळ अधिकारी विशाखा मुन, सहाय्यक फौजदार संतोष चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
यांचा मोर्चात सहभागी
मोर्चात रवींद्र हिरोळे, अशोक निकम, सुनील तायडे, विनोद मोरे, अनिल बडगे, राजू थाटे, अॅड.राहुल लहासे, सिद्धार्थ थाटे, अनिल वाघ, सरपंच गणेश तायडे, अतुल हिरोळे, दीपक हिरोळे, गौतम वाघ, जितेंद्र निकम, प्रवीण दामोदरे, पंकज रोटे, प्रशांत हिरोळे, जितेंद्र वाघ, बाळू झनके, राहुल इंगळे, सरपंच प्रमोद इंगळे, पप्पू गोळे, सुनील खराटे, भागवत दामोदरे, विजय इंगळे, राजरत्न इंगळे, विनायक हिरोळे, संतोष झाल्टे, संजय झाल्टे, सतीश वानखेडे, प्रकाश रोटे, राहुल रोटे, पंकज रोटे, सुनील कोंगळे, नवराज तायडे यांनी परिश्रम केले.
वढोदा येथून पायी धम्म यात्रा
कुर्हा येथील शांती मोर्चाला वढोदा येथील बौद्ध उपासक-उपासिका दहा किमी पायी चालत आलेत. पप्पू गोळे यांनी पायी धम्म यात्रेतील सहभागी जनतेला नाश्ता आणि शरबतचे वाटप केले.


