बिबट्याचा उपद्रव थांबेना : तळोद्यात महिलेनंतर आता 10 वर्षीय बालिकेचा घेतला बळी

तळोदा (17 मार्च 2025) : तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे दोन दिवसांपूर्वी 45 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एका 10 वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 24 तासात दोन बळी गेल्याने तळोदा तालुका हादरला आहे.
काय घडले नेमके ?
प्राथमिक माहितीनुसार, दीपमाला नरसिंग तडवी ( 10) रा. सरदार नगर ही आपल्या मैत्रीणीसोबत सकाळी 10 वाजता रेवानगर येथिल तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मकईच्या शेतात मक्की घेण्यासाठी गेली असता.शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दिपमालावर अचानक झडप घातली. व तिला मकईच्या शेतातून 50 मीटर अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर, कानाजवळ जबर जखमा करत तिला जागीच ठार केले.
सोबत असलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी यांना घटनेची माहिती देताच दीपमालाच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
दोन दिवसांपूर्वी 45 वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले. लागोपाठ नरभक्षक बिबट्याने 24तासात 2 जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे.
वनविभागाने बिबट्या जेरबंद न करता , आता तळोदा तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठीं ठोस उपाययोजना करायला हवी. नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी कोणाचा बळी पडेल या भितीने शेत शिवारात वावरणारे बिबट्याचा दहशतीने प्रचंड घाबरले आहेत.
तळोदा तालुक्यातून बिबटे हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी. आता वनविभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेत शिवारातील बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी शेत शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे. नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वनविभागाच्या कामगिरीवर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.