डांभूर्णी गावातील तरुणावर दोघांचा कोयत्याने हल्ला
यावल (5 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे 35 वर्षीय तरुणावर दोघांनी कोयत्याने हल्ला चढवला. गावातून जळगावकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या तोल काट्याजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
डांभूर्णी गावात खळबळ
डांभूर्णी, ता.यावल या गावातून जळगावकडे जाणारा रस्त्यावर तोल काट्याजवळ दत्तात्रय लिलाधर कोळी (35, रा.डांभूर्णी) हा तरुण उभा असताना करण हनुमंत पाटील आणि मनोज हनुमंत पाटील या दोन्ही भावांनी वाद घातला व त्याच्यावर थेट कोयत्याने हल्ला चढवला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती यावल पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी हे दाखल झाले. घटनास्थळी त्यांनी पंचनामा केला आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




