श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील देवालयांमध्ये भक्तीरसाची उधळण

साईबाबा पालखी मिरवणुकीत बाल वारकर्‍यांनी केला हरिनामाचा गजर


भुसावळ (7 एप्रिल 2025) : शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये रविवारी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांचा ओघ सुरू होता. मंदिरांची सजावट, रोषणाई व विविध धार्मिक कार्यक्रमांनी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. म्युनिसीपल पार्क भागातील श्रीराम मंदिरात भाविकांनी रांगा लावून प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले.

म्युनिसिपल पार्क श्रीराम मंदिर
रामनवमीनिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे श्री महागणपती पूजनाने प्रारंभ झाला. विविध होम, स्तोत्रपठण, कलश स्थापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राम मंदिरासमोरील मार्गाचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक परीरक्षीत बर्‍हाटे यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी, महंत आदी उपस्थित होते.

रामजन्माच्या किर्तनाचा आनंद
शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील पुरातन चौकांच्या श्रीराम मंदिरात देवेंद्र जोशी महाराज यांनी कीर्तन केले. या मंदिरात 30 मार्चपासून दररोज सायंकाळी भावार्थ रामायणावर स्वामी रमेशानंद यांचे प्रवचन सुरू होते. त्याचाही समारोप झाला. रामनवमीनिमित्त मंदिराच्या सजावटीसह रोषणाईही करण्यात आली होती. यावेळी शहरातील भाविकांची उपस्थिती होती.

बालवारकर्‍यांनी साईराम पालखीत आणली रंगत
शहरातील साईबाबा मंदिर देवस्थानातर्फे सायंकाळी श्रीराम पालखी मिरवणुक काढण्यात आली. फुलंब्री येथून आलेले 100 टाळकरी व वारकरी सहभागी झाले होते. त्यांनी विठू नामाचा जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूकीत रंगत आणली. शहरातील साईबाबा मंदिर, नाहाटा चौफुली, अष्टभुजा देवी, ब्राह्मण संघ, मरीमाता मंदिर, सराफ बाजारातील श्रीराम मंदिर, बाजारपेठ पोलीस ठाणे, पांडुरंग टॉकीजमार्गे पुन्हा साईबाबा मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला. केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, साईभक्त तथा माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संगीतमय हनुमान चालिसा पठण
श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून विश्वहिंदु परिषद, क्रीडा भारती, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी
संगीतमय हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी 38 भाविकांनी सहभाग नोंदवला. प्रतिमा पूजन जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वरुण इंगळे आदींसह सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !