भुसावळातील विनायक कॉलनीत धाडसी घरफोडी : साडेतीन लाखांचे दागिणे लंपास
Bold burglary in Vinayak Colony, Bhusawal : Jewelry worth Rs. 3.5 lakhs stolen भुसावळ (15 एप्रिल 2025) : भुसावळ शहरातील विनायक कॉलनीत बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी 39 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले. घरफोडीची घटना 2 ते 6 एप्रिलदरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दप्तरी जुन्या दरानुसार सोन्याच्या दागिण्यांची किंमत 73 हजार रुपये लावण्यात आली असलीतरी प्रत्यक्षात आजच्या दरानुसार सोन्याचे दागिण्याची किंमत साडेतीन लाखांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बंद घराला केले टार्गेट
शहरातील विनायक कॉलनीत प्रेमनाथ शिवचरण दास गिनोत्रा (68) हे वयोवृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. 2 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून 73 हजार 104 रुपये किंमतीचे दागिणे लांबवले. गिनोत्रा परिवार गावाहून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजार मूल्यानुसार साडेतीन लाखांचे दागिणे
चोरट्यांनी सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 20 ग्रॅम वजनाचे झुमके, सहा ग्रॅमच्या कानातल्या रिंगा, सात ग्रॅम वजनाची अंगठी व 30 ग्रॅम वजनाचा गोल्ड प्लेडेट चांदीचा नेकलेस मिळून एकूण 73 हजार 104 रुपयांचे दागिणे लंपास केले. दरम्यान, पोलिसांनी सोन्याचे दर हे 1970 व 1990 मध्ये खरेदी केलेल्या दागिण्यांप्रमाणे लावले असलेतरी त्याचे आजचे बाजारमूल्य सुमारे साडेतीन लाखांवर आहे. दरम्यान, धाडसी घरफोडीने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.




