जळगावात वृद्धेला बोलण्यात गुंतवून भामट्यांनी सोन्याची पोत लांबवत हातात दिले दगड
जळगाव (17 एप्रिल 2025) : शहरातील भजे गल्लीत एका बाहेरगावाहून आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत विश्वास संपादन करीत लांबवत भामट्यांनी वृद्धेच्या हाती दगड सोपवले. फसवणुकीची ही घटना मंगळवार, 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घडली. या संदर्भात रात्री 9 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील राहणार्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (60) या मंगळवार, 15 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता जळगाव शहरातील बसस्थानकावर उतरल्या. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांना भेटले व त्यांचा विश्वास संपादन करून करून त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत काढून संशयीताच्या हातात दिली व भामट्यांनी ही पोत कागदाच्या पुडीत बांधल्याचा बनाव करीत पुडी वृद्धेच्या हाती सोपवली व संशयीत पसार झाले. वृद्धेने पुडी उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड आढळल्याने वृद्धेने तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.


