यावल तालुका हादरला : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू
Yaval taluka shaken : Two-year-old girl dies in leopard attack यावल (17 एप्रिल 2025) : आईसोबत झोपलेल्या दोन वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. 741 मध्ये घडली रत्नाबाई सतीश रुपनर (2) असे मृत बालिकेचे नाव आहे.
मेंढपाळाचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसांपासून वास्तव्यास आहे. बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रत्नाबाई ही आपल्या आईसोबत झोपली असताना बिबट्याने हल्ला केला व केळीच्या बागेत बिबट्या पसार झाला. गुरुवार, 17 रोजी सकाळी या चिमुकलीचा मृतदेह छिन्नभिन्न अवस्थेत अढळून आला.

डांभुर्णी शेत शिवार काइभुईच्या जंगलात मेंढपाळचे तीन कुटुंब शेतात वास्तव्याला आहेत. दिवसभर आपल्या मेंढ्यांना जंगलात चारून हे कुटुंबीय रात्री झोपी गेले. दोन वर्षीय रत्नाबाई आपल्या आईच्या कुशीत झोपली असताना बिबट्याने उचलून नेल्याचे मयत चिमुकलीची आई जिजाबाई रुपनर यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात बिबच्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी व मजूरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन अधिकारी विपुल पाटील, आरएफओ सुनील भिलावे व अन्य सहकार्यांना माहिती कळताच सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल पाटीलसह संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भेट दिली.




