जालन्यातील फौजदार चोरीच्या रॅकेटसह जाळ्यात : चोपड्यातील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ
Jalna policeman caught with theft racket: Action in Chopra creates stir in police circles चोपडा (17 एप्रिल 2025) ः : शिस्तीच्या खात्यातील फौजदारानेच चोरट्यांचा साथ देत राज्यभरात नेटवर्क निर्माण केले मात्र चोपड्यात चोरी केल्यानंतर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी फौजदारासह त्याच्या अन्य तीन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रल्हाद मान्टे असे अटकेतील फौजदाराचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी वसंत उखा कोळी यांचे 35 हजार रुपये चोरट्यांनी चोपडा बसस्थानकातून चोरून नेल्याची घटना बुधवारी तीन वाजेच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर चोरट्यांनी वापरलेल्या इंडिगो कार (एम.एच.43 एन.2928) चा पाठलाग करत पोलिसांनी चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोरट्यांना कारसह ताब्यात घेतले.
धक्कादायक म्हणजे, या चार चोरांमध्ये जालना येथील पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे याचा समावेश असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे याने चोरी केल्याची कबुली दिली असून, तो राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
प्रल्हाद मान्टे तीन महिन्यांनी होणार होते सेवानिवृत्त
चोरटा पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे हा तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्यापूर्वी तो चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला. दरम्यान, त्याला चोरी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पकडले जावू नये म्हणून प्रल्हाद मान्टे हा कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या कारमधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य, अंथरूण-पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात फौजदार जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे व पोलीस कर्मचारी रितेश चौधरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


