डांभूर्णी शिवारात दोन वर्षीय बालिकेचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद
Man-eating leopard that killed two-year-old girl in Dambhurni Shivara captured डांभूर्णी, ता.यावल (18 एप्रिल 2025) : मेंढपाळ कुटूंबाच्या झोपडीत झोपलेल्या दोन वर्षीय बालिकेवर हल्ला करीत तिचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता ही कारवाई करण्यात आल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या बिबट्याला आता नागपूरच्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात येणार आहे.
झोपलेल्या बालिकेचा घेतला बळी
मेंढपाळाचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसांपासून डांभूर्णी शिवारातील प्रभाकर श्रीकृष्ण चौधरी यांच्या गट क्रमांक 741 शेतात वास्तव्यास आले आहे. बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रत्नाबाई सतीश रुपनर (2) ही चिमुकली आपल्या आईच्या कुशीत झोपडीत झोपल्यानंतर मध्यरात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला करीत जंगलात नेत तिचा फडशा पाडला होता.

24 तासांच्या आत बिबट्या जेरबंद
दोन वर्षीय बालिकेचा बळी बिबट्याने घेतल्यानंतर वनविभागाने तातडीने या भागात मेंढी ठेवून चार पिंजरे लावले होते व गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास बिबट्या मेंढीच्या शिकारीसाठी येताच तो वनविभागाच्या पिंजर्यात अलगद अडकला.
यावल वनविभागाचे उपसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, वन क्षेत्रपाल विपुल पाटील हे सकाळपासून येथे तळ ठोकून होते.
प्रसंगी घटनास्थळी नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बिबट्या पकडण्यात आल्याने शेत-शिवारात कामासाठी जाणार्या शेतकर्यांसह शेतमजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.




