शेतकर्याला लुटणार्या जालन्यातील फौजदारासह चौकडीची पोलीस कोठडीत रवानगी
लॉकअप गार्ड असताना चोरट्यांशी गट्टी, अखेर आली अंगलट
Four men, including a Jalna police constable who robbed a farmer, sent to police custody चोपडा (19 एप्रिल 2025) : जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावर एका शेतकर्याच्या 25 हजार रुपयांची रोकड चोरणार्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यात चक्क एक पोलिस अधिकारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रल्हाद पिरोजी मानटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड पीएसआय) म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय प्रल्हाद मानटे याची चोरी करणार्या टोळीसोबत ओळख लॉकअप गार्ड असताना झाली होती. बसस्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेऊन मानटे याने चोरीची योजना आखली. त्यानंतर त्याने काही सराईत चोरांना हाताशी धरून गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध बसस्थानकांवर चोर्यांचा धडाका लावला.
कुंपणाला शेत खाऊ देणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


