भुसावळातील आरपीएफ कर्मचार्याला चाकू दाखवून मारण्याची धमकी : त्रिकूटाविरोधात गुन्हा ; एकास अटक
Threatening to kill RPF employee at knifepoint in Bhusawal : Crime against trio ; One arrested भुसावळ (19 एप्रिल 2025) : रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीवरील कर्मचार्याला चाकू दाखवून धमकावणार्या त्रिकूटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एका संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. मिहिर दिलीप तायडे (24, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
काय घडले शहरात
रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार लालजी श्रद्धानंद यादव (43, आरपीएफ बॅरेक, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 16 रोजी रात्री 11.30 वाजता वरणगाव रोडवरील पंधरा बंगला भागात गस्त घालत असताना तीन्ही तरुण संशयीतरित्या फिरताना आढळल्याने त्यांना हटकले असता आरोपी रितीकने तुम अपना काम करो, मेरा काम रेल्वे का लोहा चोरी करना, असे सांगून हुज्जत घातली तसेच देशमुख नामक संशयीताने चाकू काढून मारण्याची धमकी दिली. आरोपी रितीक निंदाणे, देशमुख व अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील मिहिर दिलीप तायडे (24, भुसावळ) यास अटक केली असून न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
संशयीतांनी फुलगावात दुचाकी पेटवली
भुसावळ शहर पोलिसात काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी तुषार उर्फ तानिया अनंत बाऊस्कर (29, फुलगाव) हिच्यावर डीआरएम कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला होता. शहर पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या रागातून संशयीत निखील हरणे व मिहिर तायडे (दोन्ही रा.भुसावळ) यांनी 17 रोजी पहाटे तीन वाजता बाऊस्कर यांची दुचाकी (एम.एच.19 ई.पी.6469) पेटवून दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.




