रेल्वे दलालांवर ऑपरेशन उपलब्धची कारवाई : भुसावळात एकाला पडल्या बेड्या
Operation Aadhaar takes action against railway brokers : One person arrested in Bhusawal भुसावळ (20 एप्रिल 2025) : रेल्वे तिकीट दलालांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ मोहिमेअंतर्गत भुसावळ जंक्शनवर रेल्वे सुरक्षा बलाने मोठी कारवाई करत एका दलालाला अटक केली. आरक्षण केंद्रावरून प्रवाशांना कमिशनवर तिकिट पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार, 18 रेाजी सकाळी 8.02 वाजता कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ जंक्शनवरील आरक्षण तिकीट खिडकीवरून अवैधरित्या तिकीटे काढली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलास मिळाल्यानंतर संशयीताविरोधात पाळत ठेवण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवडे, सहायक फौजदार दीपक कवळे आणि एएसआय शिवानंद गीते यांच्या पथकाने संशयीत आवेस शेख (22, रा.रजा टॉवर, मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यास ताब्यात घेतले. संशयीताकडे गाडी क्रमांक 11078 झेलम एक्सप्रेसचे 17 जून 2025 चे जम्मूतवी ते भुसावळ दरम्यानचे स्लीपर क्लासचं तिकीट (पीएनआर- 243-3723023) सापडले.

तपासात त्याने हे तिकीट इतर प्रवाशासाठी कमिशन घेऊन आरक्षित केल्याचं कबूल केलं. तिकीटाची मूळ किंमत 670 रुपये तर त्यावर अतिरिक्त 330 कमिशन आकारल्याचं स्पष्ट झालं.
घटनास्थळी पंचनामा करून एकूण एक हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. संशयीताविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलातर्फे दलालीविरोधात भविष्यातही अशा कारवाया सुरू करराहणार असल्याचे अधिकारी म्हणाले.




