चाळीसगावात शहर पोलिसांची सतर्कता : आगीनंतर वाचवले सहा जणांचे प्राण
बचाव कार्यादरम्यान चाळीसगावातील पोलीस उपनिरीक्षक सायकर जखमी
City police alert in Chalisgaon: Six lives saved after fire चाळीसगाव (22 एप्रिल 2025) : चाळीसगाव शहर पोलिसांनी शहरात लागलेल्या भीषण आगीची पर्वा न करता सहा ते सात जणांचे प्राण वाचवत आपल्या कार्याचा परिचय दिला. चाळीसगावच्या भडगाव रोडवरील हॉटेल मनसुखमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.
आगीत हॉटेलमधील जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या 6 ते 7 जणांना अत्यंत धाडसाने सुरक्षितरित्या बाहेर काढले आणि त्यांचे जीव वाचवले. या बचावकार्यात पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर यांना दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. अग्निशमन दलाच्या (फायर ब्रिगेड) जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
सतर्कता व धाडस कौतुकास्पद
चाळीसगाव शहर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन नेहमीच तत्पर असते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी म्हणाले.


