धावत्या रेल्वेवर दगड भिरकावल्यास खबरदार !

आरपीएफतर्फे विशेष जनजागृती मोहिम : स्थानक परिसरात संवाद, पोस्टर्सद्वारे माहिती


Be careful when throwing stones at a moving train! भुसावळ (22 एप्रिल 2025)  : रेल्वेवर व रेल्वे रुळांवर दगडफेक करणे, लाकूड किंवा इतर बाह्य वस्तू ठेवणे ही गंभीर आणि अपघाताला निमंत्रण देणारी कृती असून त्याविरोधात रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) भुसावळ विभाग यांनी विशेष जनजागृती मोहिम राबवली. ही मोहिम अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, खंडवा, जळगाव, भुसावळ, मनमाड या स्थानकांवर तसेच परिसरातील गावांमध्ये राबविण्यात आली.

रुळांवर अडथळे म्हणजे थेट धोका
या मोहिमेचा उद्देश रेल्वे रुळांवर जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे दगड, लाकूड, किंवा इतर वस्तू ठेवणार्‍या नागरिकांना या कृत्यांच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देणे हा होता. अशा कृतीमुळे रेल्वेगाड्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतोच, शिवाय अपघात होण्याची शक्यता वाढते.


रेल्वे परिसरात थेट संवाद, पोस्टर्सची मदत
या मोहिमेदरम्यान आरपीएफ अधिकारी व कर्मचार्‍यांनी रेल्वे कॉलनी, गावं, रेल्वे रुळांलगत असलेल्या वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भाषेत भाषणे, पोस्टर्स आणि सूचनाफलकांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली की, या प्रकारच्या कृत्यांवर भारतीय दंड संहिता व रेल्वे कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते.

जनतेला आवाहन : संशयास्पद हालचाली तत्काळ कळवा
रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला आवाहन केले आहे की, रेल्वे मालमत्तेचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कोणीही संशयास्पद व्यक्ती रुळाजवळ दिसल्यास, त्वरित आरपीएफ किंवा जवळच्या रेल्वे स्थानकाला माहिती द्यावी.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !