यावल तालुका हादरला : बिबट्याचा हल्ला, शेतकरी बचावला : बकरी केली फस्त
Yaval taluka shaken : Leopard attack, farmer saved : Goat killed यावल (27 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकर्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र प्रसंगावधान राखत शेतकर्याने बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर-जोरात आरडा-ओरड केल्याने बिबट्या तेथून पळाला तर बिबट्याने बकरी फस्त केली. बिबट्यासह एक त्याचे पिल्लू देखील सोबत असल्याने शेतकर्याने सांगितले.
शेतकर्यांमध्ये पसरली भीती
या प्रकाराने डोंगरकठोरा परिसरात भीती पसरली आहे. वनविभागास माहिती देण्यात आली आहे. वन-विभागाकडून या शेत-शिवारात विविध ठिकाणी कर्मचार्यांच्या गस्तीसह ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. डोंगरकठोरा येथील शेतकरी मनोहर बळीराम पाटील हे गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत होते. त्यांना बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याचे दिसले व बकरी फस्त केलेल्या बिबट्याला पाहून पाटील लगबगीने केळी बागातून बाहेर पळू लागले असता बिबट्याचे एक लहान पिल्लूला ते धडकले व जमिनीवर कोसळले. यात आवाज झाल्याने बिबट्याने त्यांच्या दिशेने येत त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर-जोरात आरडा-ओरड केली.

बिबट्या तेथून पळून गेला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांनी या भागात जावून पाहणी केली तसेच कर्मचार्यांच्या वतीने या भागात ट्रॅप कॅमेरे विविध भागात लावण्यात आले. या भागात बिबट व त्याच्या पिल्लांचा वार असल्याचे उघड झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती पसरली. स्थानिक शेतकर्यांनी बिबट्याला तत्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली.
कॅमेर्यांच्या मदतीने घेणार शोध
ज्या भागात बिबट्या दिसला व बकरीची शिकार केली. त्या भागात पिंजरे लावण्यात येतील तत्पूर्वी कॅमेर्यांच्या मदतीने बिबट्यांवर निगराणी ठेवली जात आहे. विविध भागात टॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी दिली. दरम्यान, डोंगरदे या पाड्याजवळ मेंढपाळ ठाकूर पावरा यांचे बकर्यांचे कळप आहे. तेथून बिबट्याने बकरी पळवली होती व तिची शिकार केल्यानंतर केळीच्या बागात बिबट होता.




