पुण्यातील वृद्धाचा जळगावात आढळलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह


Decomposed body of an elderly man from Pune found in Jalgaon जळगाव (4 मे 2025) : जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये पुणे जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (70) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन हे पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील आंबेगावचे रहिवासी असून ते रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचा मुलगा वकिली करतो. मोहम्मद शफी हे 28 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात रबरी शिक्के बनवून देण्यासाठी आले होते. शिक्के दिल्यानंतर मात्र ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून मोहम्मद शफी यांचा शोध सुरू असताना शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमधील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडला असता आत मोहम्मद शफी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. रुग्णालयात मृतदेह पाहून मोहम्मद शफी यांच्या मुलाने आक्रोश केला. या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मोहम्मद शफी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !