भुसावळ तालुक्यात अवकाळी पावसाचा 260 हेक्टरवरील पिकांना फटका
Unseasonal rains hit crops on 260 hectares in Bhusawal taluka भुसावळ (9 मे 2025) : भुसावळ तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वार्यांसह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 54 गावांपैकी 43 गावांमध्ये 342 शेतकर्यांच्या 260 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वरणगाव महसूल मंडळातील पिंप्रीसेकम, कठोरे बुद्रुक, कठोरे खुर्द, हातनूर आणि टहाकळी या गावांना तहसीलदार निता लबडे यांनी भेट देऊन पहाणी केली. नुकसान झालेल्या शेतकर्याच्या शेतात जाऊन कृषी सहायक, तलाठी यांनी पंचनामे केले आहे. नुकसानीमुळे शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तहसीलदार निता लबडे यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित गावांना भेट दिली. त्यांनी तातडीने तलाठी व कृषी सहाय्यकांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून 24 तासांत पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहायक यांनी केलेल्या पंचनाम्यांच्या अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. वादळी पावसामुळे शेतातील केळी, कांदा, पानवेल, बाजरी, मौसंबी, आंबा मका, निंबू यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीबद्दल तहसीलदार लबडे यांनी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तहसीलदार लबडे यांनी सांगितले की, तालुक्यात सुमारे 30 ते 35 टक्के नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पंचनामे करण्यात आले आहे, कोणाचे राहीले असतील तर ते सुध्दा केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
असे झाले नुकसान
ज्वारी 4 हेक्टर, कांदा 15 हेक्टर,पानवेल 10 हेक्टर, मका 34 हेक्टर, बाजरी 3 हेक्टर, केळी 106 हेक्टर,निंबू 85 हेक्टर,, मौसंबी 0.50 हेक्टर, आंबा 2 हेक्टर असे एकुण 259.5 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 342 शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागातर्फे केले आहे.


